Saturday 16 August 2014

असण्या नसण्याचा शोध - अस्तू

कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा, चित्र, कविता; ह्या सगळ्यामधून कलाकार काहीतरी शोधण्याचा प्रयत्न  असतो. माणसाचं मन, त्याची गुंतागुंत, नाती, समाज आणि अजून  दुनियाभरचं काहीबाही. अस्तू चित्रपटातून दिग्दर्शकद्वयीने हेच शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

कथा आहे संस्कृतचे प्राध्यापक Dr. शास्त्रींची. एकेकाळी प्राध्यापक असणाऱ्या शास्त्रींना अल्झायमर (स्मृतीभ्रंश) झालेला आहे.  त्यांची मुलगी ईरा तिला जमेल तशा पध्द्तीनं त्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न करतीए. अशाच एके  दिवशी ते भर लक्ष्मी रोड वरून (लक्ष्मी नावाच्याच हत्तीणीमागं जात जात) हरवतात. ईरा त्यांना शोधायला लागते. तिला आधीचं सगळं आठवू लागतं आणि त्यातून वेगवेगळी पात्र त्यांचे स्वभाव परस्पर संबंध उलगडत जातात.

आपल्यासमोर कथा दोन track  वर चालते... खरंतर  तीन. एक-Dr. शास्त्री (मोहन आगाशे) हत्तीणीच्या मागं फिरत जातात. माहूत (नचिकेत पूर्णपात्रे)  आणि त्याच्या कुटुंबासोबत एक आख्खा दिवस काढतात. दुसरा-ईरा नवऱ्याच्या (मिलिंद सोमण) आणि पोलिसांच्या मदतीनं आपल्या वडीलांना शोधण्याचा प्रयत्न करतीए. हे दोन्हीही tracks वर्तमानात सुरू आहेत. तिसरा track म्हणजे आपल्या वडीलांना शोधताना तिला आठवणारा त्यांचा भूतकाळ! वर्तमान आणि भूतकाळ अशा तळ्यात-मळ्यात कथा फिरत राहते.

एकेकाळी कालिदास गीता उपनिषदं बिनचुक पाठ असणारा म्हातारा प्राध्यापक आता अर्धमुर्ध जस आठवेल तसं संस्कृत श्लोक म्हणतोय. ते संस्कृत त्याच्या असण्याचा इतका घट्ट भाग आहे की त्याशिवाय त्याच्या असण्याला काही अर्थ नसेल. तो जेव्हा चन्नमाला (माहुताची पत्नी - अमृता सुभाष) ) बघतो तेव्हा तिच्यात स्वत:ची आई बघतो. आयुष्याच्या या टप्यावर हेच नातं हवहवंस वाटत असेल का?

दुसरीकडं ईरा (ईरावती हर्षे ) स्वत:ला कोसतीए. वडीलांना संभाळण्याची जबाबदारी तिच्याकडं आलीए. तिला प्रचंड ताण आलाए. पण स्वत: असताना वडलांना वृद्धाश्रमात पाठ्वायलाही ती तयार होत नाहीए. लहान बहीण राही (देविका दफ्तरदार)  जेव्हा म्हणते की 'माणूस त्याच्या मेमरीशिवाय मृत असण्यातच जमा आहे' तेव्हा तिला ते ऐकवत नाही पण पटतंय.. मनातून कदचित! आपल्या वड्लांचं आधी त्यांच्या colleague सोबत अफेअर चालू होतं आणि त्यामुळं आपल्या आईला शेवटच्या दिवसांमध्ये खूप त्रास झाला अशी खोल भावना तिच्या मनात आहे. पण हे ती मान्य करायला तयार नाही, स्वत:च्या नवऱ्यापाशीही नाही. वडलांना सांभाळ्ण्यामधे प्रेम किती आणि कर्तव्याची भावना किती हा तिलाही न सुटणारा प्रश्न आहे. त्यामानाने राहीचे बुद्धिनिष्ठ विचार तिला स्वत:ला मनस्ताप तरी देत नाहीत. ह्या सगळ्यामध्ये अचानक घरी आलेल्या या आगंतुक वेड्या म्हाताऱ्या माणसाची आई बनणारी चन्नमा माणसातल्या तरल नात्यापाशी जाउन पोहोचते.

अशा चित्रपटांमध्ये कथा (plot) असा काही फार गुढ, विशेष, चित्तथरारक  नसते. कथासूत्र आपल्याला हाताला धरून संपुर्ण गाव फ़िरवून आणतं ( इथं तर शब्दश: पुणं फ़िरवून आणलंय)... माणसांच्या भावविश्वाचा धांडोळा घेतं... आणि कथेपलीकडच्या intangible भावनिक अनुभवापाशी आणून सोडतं. त्यामुळे ईराला वडील सापडतात का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात चित्रपट अडकत नाही पण हरवलेले वडील शोधत असतानाच्या प्रवासात वडीलांच्या तिलाही माहिती नसणाऱ्या बाजू समोर येतात.

कथेपलीकडं जाऊन अस्तू खूप काही दाखवतो. संस्कृत पंडीत असलेल्या पण स्मृतीभ्रंश झालेल्या शास्त्री आणि हत्ती यांच्यातलं symbolism अप्रतिम आहे. चित्रपटाचा सुरुवातीची १५-२० मिनिटं लक्ष्मी रोड वरच्या असल्यामुळं चित्रपटाचा tone खूप मस्त सेट झालाय. लेखन (सुमित्रा भावे), दिग्दर्शन (सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर), अभिनय (सगळेच अप्रतिम), cinematography, background-score (साकेत कानिटकर, धनंजय खरवंडीकर), costume-designing, editing (मोहीत टाकळकर) या सगळ्यांच्या एकत्र परिणामामुळं चित्रपट अतिशय जीवंत अनुभव देतो. 'अरेरे, कशीही आजची पिढी? आईबापाला वृध्दाश्रमात ठेवते !', 'बघा हा म्हातारा बघा, मुलीच्या निष्काळजीपणामुळं कशी याची परवड होतीए', ' कसा हा नियतीचा खेळ, पोटच्या मुलींना नकोसा झालेला बाप पण एका गरीब बाईनं याला पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं' अशा बटबटीत भावना आजिबात न देता आपल्या आतल्याचं खूप सुक्ष्म emotions ला अस्तू स्पर्श करतो.

ईरा आणि शास्त्री यांच्यातील 'झेन' philosophy चा सीन चित्रपटाचा गाभा पकडण्याचा प्रयत्न करतो असं वाटलं. माणसाचं अस्तित्व त्याच्या भूत भविष्य आणि वर्तमानाच्या पकडीतून कसं शोधावं हे अस्तू दाखवतो. मी चित्रपटावर तीन चार दिवस विचार करून, मित्रांशी बोलून, हे सगळं लिहूनही कथेच्या बीजापर्यंत माझा मेंदू घेऊन पोहोचू शकलो नाही. पण अजूनही चित्रपट मनात रेंगाळतो आहे. चित्रपट अजून चित्रपटगृहातही रेंगाळतो आहे तोवर लवकर बघून घ्यावा.


For me ASTU is a must watch who loves cinema!