Friday 20 June 2014

The world before her - जग... तिच्या आधीचं.. समोरचं.. तिच्यामुळे.. तिच्याशिवाय..

खूप दिवसांपासून ब्लॉग (तरी) लिहावा असं वाटतं होतं. पण अंगभूत आळस आणि लिहिलेलं वाचलं जाईल की नाही ह्याची भीती त्यामुळं दरवेळी अत्यंत दरिद्री कारणं देऊन मी टाळत होतो. पण हा पिक्चर बघितल्यानंतर घाईचा ब्लॉग लागला.... आणि म्हणतातच ना की आपलं लिहित जायचं, 'लेखन' त्याचा त्याचा वाचक शोधेल ! (कळस आणि किळस म्हणजे हे तरी वाचलं जाईल की नाही ह्याचीही भीती वाटतीए ;)   
तर The world before her !

मी तिकीट काढून बघितलेली ही पहिली डोक्युमेंटरी. मला वाटतं आपल्याकडं  डोक्युमेंटरी बघण्याचं फार फॅड  नाही. त्यामुळं बनवण्याचंही. खूप वाटूनही मी Gulabi gang बघितली नाही. (प्रायश्चित्त म्ह्णून माधुरीचा गुलाब गॆंगला पण नाही गेलो. फ़िट्टंफ़ाट ) त्यामुळं ह्यावेळी बघायचीच असं नक्की केलेलं. जाण्याआधी The world चे आठेक trailers तरी बघितलेले. त्यांनी almost निम्मी documentary trailers मधेच दाखवलीए. पण त्यानं काही फरक पडत नाही. कारणं जो अनुभव documentary आपल्याला देते तो खूपच तीव्र आणि खरा आहे. 

The world आपल्याला 'तिच्या'समोरची खूप टोकाची चित्र दाखवते. एक आहे  fashion च्या जगात स्वत:चं अस्तित्व, स्वप्न, ओळख शोधणारी ती आणि दुसरी 'ती' जी दुर्गावाहिनीच्या (हे विश्व हिंदू परीषदेची lady wing आहे. हे मला documentary बघतानाच कळलं.) शिबिरांमध्ये राष्ट्र आणि स्व सुरक्षेचे धडे गिरवतिए जिथे प्रखर हिन्दुत्वाचा आणि मुस्लिम विरोधाचा पाया भक्कम केला जातोय. (एक शिबिरार्थी म्हणते मला अभिमान आहे की मला कोणीही मुस्लीम मित्र मैत्रिण नाही) ही दोन्ही जगं तितकीच प्रभावी intriguing दाहक  आहेत. दिग्दर्शिकेला जे मांडायचं आहे ती मांडण्यात ती 200% यशस्वी होते. चित्रपट  संपताना  कुठल्याही जगाबद्दल कितीही राग (तो  दोन्हिही जगाबद्दल यावा अशीच मांडणी  आहे पण अर्थातच ते एका फ़ील्मचं कामं नाही.) आला तरी 'ती' शेवटपर्यंत naive, vulnerable वाटतं  राहते.

documentary सूरू होते  fashion world पासून आणि आलटून पालटून (म्हणजे वाट्टेल तसं नाही. editing ही एक कला आहे.) ती दोन्ही जगांची चित्र उलगडतं जातात. fashion च्या जंगलाची सफर  नयनरम्य आहेच पण ते वास्तवाला धरुन आहे.  कंठाळी नाही. 'fashion' चित्रपटाप्रमाणं ते एकांगी वाटतं नाही. Femina miss India होण्यासाठी आलेल्या मुली त्यांचे mentors, beauty surgeon, पालक ह्यांच्या मुलाखतींमधुन ते जग उलगडत जातं. ह्यातले पालक 'उगाच' जुनाट विचारांचे नाहीत, त्यांना आपल्या मुलींचा अभिमान आहे. इथं आलेल्या मुलींना माहितीए की त्यांना काय sacrifice करावं लागणारे. त्याच्या त्यांना कधीकधी त्रासही होतो. त्या मुलींची धडपड खूप खरी आणि भाबडी वाटते. सुरुवातीला ultramodern वाटणाऱ्या  जगाचा हळूहळू त्रास होऊ लागतो. 

कपाळ ते नाकाची सुरुवात, नाक ते वरचा ओठ  आणि खालचा ओठ ते हनुवटी असे चेहऱ्याचे तीन भागात विभाजन करून ते भाग जर समप्रमाणात नसतील तर सर्जरीने ते तसे केले जातात (मी लगेचच  माझ्या चेहर्याचं तसं माप घेतलं. मलाही सर्जरी करावी लागेलं.) गोव्याच्या बीचवर  कंबरेपर्यंत पांढरं कापड गुंडाळून  - ते बुरख्यासारखं  वाटतं - ramp walk करायला लावतात. कारणं त्यांच्या mentorला त्यांचे फक्त लेगपीस बघायचे असतात. चेहर्याचा अडथळा नको असतो. Actual Beauty Contest मध्ये त्यांना प्रश्न विचारले जातात. dino morea, fardeen khaan (ह्यांची initials Capital मध्ये लिहायचा कंटाळा आला) आदी महान हस्तींकडून ! (अर्थात ते खरं फ़ूटेज आहे.) कारण फक्त सौंदर्यावर विजेते ठरणार नसतात. मग त्यांचा हजरजबाबीपणा वगैरेंना मार्क देऊन विजेते ठरवले जातात. आपली documentary ज्या contestantला आणि तिच्या पालकांना follow करत असते ती जिंकते की हरते हे बघणं नक्कीच interesting आहे. 

एक जग जिथं शरीराला भयंकर किंमत आहे. जिथं तीची identity, confidence build up करायला तिच्या अवयवांची सतत मदत लागते ते जग आधुनिक gender equality चा ढोल पिटणार  म्हणून कसं मानायचं? अर्थात नाही पटलं तर कायदा हातात घेऊन ते जग मोडीत काढावं का? की जे शाश्वत आहे ते टिकेलचं? मग संस्कृती रक्षणाचं आणि रक्षकांचं काय? अर्थात दिग्दर्शिका ह्या प्रश्नाची उत्तरं तीचीतीची शोधते. पण आपल्याला मान्य करण्याचं बंधन नाही... शोधण्याची मुभा, संधी, निकड आहेच.

दुसरं जग हे प्रामुख्यानं प्राची (24  वर्षाची युवती जी दुर्गावाहिनीचं शिबीर कही वर्ष घेतीए) आणि तिचे बाबा ह्यांच्या माध्यमातून आपण बघतो. एक चांगली गोष्ट म्हणजे हे जग मराठी आहे त्यामुळे त्यांचे संवाद हे आपल्याला नीट  कळतात. (subtitles कधीकधी गंडलीएत आणि भाषेतले टक्के टोमणे subtitles मध्ये येऊच शकत नाहीतं.) RSS चा पगडा असलेलं कुटूंब. अत्यंत कडक शिस्तीचे वडील त्याचंच रक्त असलेली मुलगी, त्यांचं नातं , त्यांची भांडणं आपण बघतो. शेवटी प्राची हे मान्य करून टाकते की माझ्या जन्मानंतर मी मुलगी असुनही त्यांनी मला मारूनं टाकलं नाही हेच खूप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर ! 

वाहिनीच्या शिबिरातले कार्यक्रम, शस्त्रास्त्र शिक्षण, भाषणं (अपर्णा रामतीर्थकर त्यांच्या आवाजासकट डोक्यात जातात) शिबिराच्या शेवटच्या दिवशीची rally, त्यातल्या घोषणा,  सहभागी मुलींच्या मुलाखती (वय 10 ते 14) हे सगळं fundamentalist camp प्रमाणेचं दिसतं. प्राची म्हणते मला साध्वी प्रद्न्यासिंह व्हायचंय. तिला लग्न करायचं नाहिए आणि अर्थात तिच्या वडीलांना हो मान्य होणं शक्य नाही. ते त्यांच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. ज्या संस्कृतीच्या रक्षणाच्या कामासाठी प्रचीला लग्न करायचं नाहिए! आणि महत्वाचं म्हणजे 'The cause which she is fighting for is itself defeating her' हे तिला माहितीए. 

आता दोन्ही बाजुंच्या समर्थकांकडून  माडंलं जाऊ शकत की हे अर्धसत्य आहे जे दिग्दर्शिकेनं तिच्या सोयिपुरतं काढून दाखवलंय. पण ही ओळख त्या जगाची defining identity आहे का? निदान दिग्दर्शिकेला तरी तसं  वाटतं. ही documentary प्राचीच्या जागाबाबत अधिक परखड वाटते. काही ठिकाणी हिंदू Fundamentalism चे references विशयापलिकडचेहि आहेत. पण तसं होणं स्वाभाविक आहे. कारणं दिग्दर्शिकेच्या अनुभवविश्वातून, worldview मधून documentary तयार झालीए आणि ती तशीच होऊ शकते. 


विषयापलीकडं जाऊनसुध्दा एक documentary म्हणून बघावी अशी ती आहे. documentary बनवायला अक्कल लागते हे आधी समजायला हवं. केलेलं footage कसंही बचाबाच दाखवण्यात मजा नाही. documentary ला सुध्दा सूरूवात मध्य आणि शेवट लागतो. दोन जगांमधले inter-cuts खूप नीट गुंफ़ल्यामुळे कथानक तयार  झालंय. डिरेक्टर (शेवटी शेवटी मी equal -gender शब्द वापारतोए जरा) स्वत: Art डिरेक्टर असल्यामुळे propsचा छान वापर केलाय. मुलाखतींच्या शिवायही दृश्य माध्यमातूनही डिरेक्टर खूप काही सांगते (आणि हे fiction नसूनही) दुर्गावाहिनीच्या शेवटच्या दिवशीच्या rally मध्ये हे नीट जाणवतं. माझ्यासाठी ही documentary हा एक अनुभव होता. I am sure it be an experience for you too!

काय करताय सध्या तुम्ही? पावसाची वाट बघताय? football? live telecast? repeat telecast ? दहावीचा result? सिरिअल्स? होणार सून मी? जेवताय? paper वाचताय? हगताय? सगळं बाजूला ठेवा… Go and watch … 'The world before her'

Who are you ? मुलागा? मुलगी? feminist? ?socialist? capitalist? हिन्दुत्ववादी? मध्यम (व/)मार्गीय? Gender sensitive? insensitive? पुरोगामी? fashion crazy?documentary haters? lovers? अनुराग  कश्यपचे भक्त?   then this is THE thing for  you !     


Trailer THE WORLD BEFORE HER     |    Ticket details

गौरव पतकी 





6 comments: