Sunday 20 July 2014

Short-CULT movies

'चित्रपट हा कुणासाठी बनवायचा?' मला वाटतं चित्रपट बनवायला लागल्यापासून काही वर्षातचं हा प्रश्न पडायला लागला असेल. अजून तळ शोधायचा प्रयत्न केला तर मला हा प्रश्न 'कला कशासाठी? लोकनुरंजन? की self-expression? की आणखी काही?' असा वाटतो. प्रत्येक कलाकार त्याच्या त्याच्या पध्द्तीनं ह्या प्रश्नाचा माग काढतो पण नवीन  येणार्यासाठी तो प्रश्न तिथेच उभा असतो. त्यात चित्रपट हे collective art, खर्चिक कला म्हणून प्रयोग करून बघण्याला आधीच मर्यादा पडतात. ह्या सगळ्यातून वाट शोधताना सर्वात effective पर्याय दिसतो तो shortfilmsचा!

Shortfilm म्हणजे फक्त 'कमी वेळाचा सिनेमा' हे खरं नाही. सिनेमा मध्ये नसलेल्या अनेक गोष्टी आपल्याला shortfilms बघायला मिळतात. Shortfilm जास्त personal अनुभव घेऊन येतात. एक छोटी कल्पना, भावना, घटना ह्यासगळ्यांशी प्रामाणिक राहून गोष्ट सांगता येते फार फ़ाफ़ट पसारा न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'प्रेक्षक' नावाचं काल्पनिक भूत (खरं म्हणजे माकड) मानगुटीवर नसतं. ३ shortfilms बद्दल लिहायचं ठरवलंय आज. ह्या तीनही shortfilms मध्ये फार काही साम्य नाही. तीनही दिग्दर्शक भारतीय आहेत आणि तीनही माझ्या आवडत्या shortfilms आहेत. एवढंच.

१. गिरणी (दिग्दर्शक : उमेश कुलकर्णी) -

काही दिग्दर्शकांवर आपलं मनापासून प्रेम असतं जसं की अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज वगैरे. त्यांच्यासोबत उमेश माझा आणखी favorite दिग्दर्शक! 'गिरणी' ही त्याच्या पहिल्या काही Shortfilm पैकी एक. ही गोष्ट आहे समीर नावाच्या एका १०, ११ वर्षांच्या मुलाची. वडील अचानक गेल्यानंतर घरची अत्यंत बेताची असलेली परिस्थिती सावरण्यासाठी त्याची आई एक गिरणी घरी आणते. दळणाचा व्यवसाय करून काही पैसे कमवावेत, हळूहळू हप्ते फ़ेडून गिरणी स्वत:च्या नावावर झाली की stable income यायला लागेल अशी तिची कल्पना. नवीन खेळणं घरात आल्याच्या उत्साहात समीर दळणाची कामं करायला लागतो. पण कलांतराने ती गिरणी त्याच्या बालपणाचा, स्वप्नांचा, आयुष्याचा आणि एकूण आस्तित्वाचाचं ताबा घेते. आधी असलेलं आकर्षण गळून पडून एक मनस्वी राग, चिडचिड आणि सणक त्याच्या डोक्यात जाते आणि तो final action घेतो.

ती action काय असेल ह्यात सस्पेन्स नाही पण तेव्हापर्यंत दिग्दर्शकाने आपल्याला समीरच्या ठिकाणी नेऊन ठेवलं असतं. त्यामुळं तो जे करतो ते खूप स्वाभाविक वाटतं. 'जगण्याची साधनं म्हणून हातात घेतलेल्या गोष्टी हळूहळू आपलं आयुष्य गिळून टाकतात आणि आपण एका चक्राकार फेऱ्यात फिरत राहतो' ही theme Shortfilm मधून पुनःपुन्हा अधोरेखीत होते.

२.  Printed Rainbow (दिग्दर्शक : गितांजली राव) -

ही एक Animated Shortfilm आहे २००६ ची. नंतर काही दिवसतरी आपल्याला मनातून ही गोष्ट पुसता येणं अवघडं जावं इतकी सुंदर गोष्ट ही. पण आपण जर Visual quality च्या पलीकडं जाऊन ही फिल्म बघू शकलो तरच किंवा Cannes festival मधली ही award Winning shortfilm आहे हे कळलं तर! गितांजलीने संपुर्ण फ़िल्ममधली चित्रं ३ वर्षं स्वत:च्या हातानं काढलीएत.

ही गोष्ट आहे एका म्हाताऱ्या आज्जीची जी तिच्या मांजरीसोबत एकटी रहतीए. तिच्याकडं काडेपेट्यांचा (matchbox) चा मोठा साठा आहे. तिच्या एकटीच्या कंटाळवाण्या आयुष्यातून ऊठून आपल्या मांजरासोबत ती काडेपेट्यांच्या मदतीने रंगबेरंगी स्वप्नांच्या दुनियेत फ़िरून येत असते. एकदा शेजारचे एक आजोबा तिच्या घरी येतात. त्यांच्याकडं एकाच प्रकारच्या २ काडेपेट्या असतात त्यातली एक आज्जीला देतात आणि एक स्वत:कडे ठेवतात. दुसऱ्या दिवशी आपली 'heroine आज्जी' आजोबांनी दिलेल्या काडेपेटीमधून तिच्या विरामाच्या प्रवासाला निघते. खऱ्या अर्थानं सुखांत असलेली ही कथा आहे.

'वासांसि जीर्णानि' या हिंदू किंवा भारतीय philosophyचं हे artistic expression खूप भावणारं आहे. आज्जीचं नेहमीचं आयुष्य black and white तर स्वप्नातलं आयुष्य color ही कल्पना खूप मस्त जमून आलीए (ती typical किंवा cliche वाटतं नाही). आज्जी जेव्हा खिडकीतून बाहेरचं जग बघते तो भाग Hitchcock च्या rare window सारखा वाटतो. एकुणातचं ही फिल्म खूप वेगळा अनुभव देऊन जाते.

३.  कातळ (दिग्दर्शक : विक्रांत पवार)

ही सुध्दा विक्रान्तची फिल्मस्कूल्मधली shortfilm. मी त्याची घड्याळांचा दवाखाना नावाची shortfilm आधी बघितलेली तीसुद्धा खूप सुंदर आहे पण कातळ मला त्यापेक्षा काही पावलं पुढची वाटली. परवा एका मित्राशी कातळ बद्दल बोलत होतो. तो म्हणला मला एवढी नाही आवडली गोष्ट मी त्याला खूप पटवायचा प्रयत्न केला आणि त्याने मला. (अर्थात) आम्ही दोघंही आमच्या आमच्या मतावर ठाम राहिलो पण त्याच्याशी बोलताना मला दिसलं की मला ही shortfilm एवढी का आवडली!

वरवर बघायला गेलं तर ह्याला एक स्पष्ट गोष्ट अशी नाही आणि म्हणलं तर आहेही! एक मुलगा शिल्पकार आहे. त्यांनी एक कातळ आणलाए ज्यापासून त्यांना शिल्प बनवायचंय पण तो कातळ तितका strong नाही त्यामुळं आता काय करावं ह्या विचारात तो आणि त्याचा मित्र आहेत. तेवढ्यात त्याला त्याच्या girlfriend चा फोन येतो ती शिकायला दुसऱ्या शहरात जाणारे आणि उद्या निघणारे. म्हणून तो हा आख्खा दिवस तिच्यासोबत फिरायला जातो. बास! एवढंच. पण दिवसभर तिच्यासोबत घालवल्यानंतर त्याला जे realization होतं ते म्हणजे 'कातळ' ! नाटकात absurdity आणता येते पण चित्रपटात कसं सगळं concrete ठाशीव लागतं. पण फिल्म सारख्या concrete माध्यमातून intangible emotion पकडण्याचा विक्रान्तचा प्रयत्न वरचा क्लास आहे. तीन्ही shortfilms खूपच सुंदर आहेत पण हे विशेषण मी ह्या फ़िल्मसाठी ठेवलं होतं. 'तरल चित्रपट!'

(तळटीप - Printed Rainbow आणि कातळ दोन्ही shortfilms Youtube वर आहेत आणि त्याच्या लिंक्स त्यांच्या टायटल्समध्ये आहेत. गिरणी नाही मिळाली Youtube वर. पण माझ्याकडं आहे If anyone wants.)


                             उमेश कुलकर्णी          गितांजली राव               विक्रांत पवार

Sunday 6 July 2014

पुणे ५२ जागतिक सिनेमाशी नातं सांगणारा अस्सल 'पुणेरी' सिनेमा - Now on Youtube

नॉआर सिनेमा, femmes fatales अशा शब्द जंजाळातून मार्ग काढत पुणे ५२ चा पत्ता शोधला. काही वेळा मुव्ही थिएटरमध्ये असताना बघायचा राहून जातो. नंतर त्याबद्दल इतकं बोललं जातं की आपल्याला मुव्ही न बघितल्याचा पश्चात्ताप होतो. मला पुणे ५२ च्या बाबतीत अशीच मळमळ खूप दिवस होती. मागच्या महिन्यात फायनली 'आरभाट'च्या प्रोडक्शन ऑफीसमध्ये गेलो. तिथं मला डीरेक्टर्स कट कॉपी मिळाली आणि आठवडाभरात निखिल महाजनने (डीरेक्टर - पुणे ५२) सिनेमा यूट्यूबवर रिलीज केल्याचं स्टेटस (अर्थात) फ़ेसबूकवर टाकलं. (आठवडाभर थांबलो असतो तर घरबसल्या बघायला मिळाला असता. असो.)  

'पुणे ५२' या नावातून सिनेमा कशाबद्दल असू शकतो याचा दूरदूरपर्यंत 'पत्ता' लागत नाही. (BTW हा सस्पेंस सिनेमा नाही.) पण नावातूनच सिनेमा काहीतरी वेगळा आहे हे समजायला लागतं. आणि तसा तो आहेही. दिग्दर्शकाने नुसती नावातच हवा केलेली नाही, संपूर्ण सिनेमा हा अत्यंत स्टायलीश आहे. सिनेमा बघत असताना आपण हॉलीवुडचा सिनेमा बघतोय का काय असं वाटावं इतका कडक सिनेमा आहे. 'नॉआर फ़ील्म' हा चित्रपटाचा खूप प्रसिद्ध जॉनर आहे - आधी फ्रेंच मग युरोप आणि मग आमेरिकेमध्ये. (म्हणजे आपल्याकडं कसे romantic किंवा comedy किंवा हाणामारी किंवा comedy किंवा हाणामारी किंवा romantic किंवा हाणामारी…. असे वेगवेगळे जॉनर असतात तसं) नोआर फ़ील्म म्हणजे डार्क सिनेमा. ज्यात एखादा खून असतो, एखादी seductive खलनायिका असते, नायक जणू सिगारेटवरचं जगतो असं वाटावं इतकं smoking करत असतो, black and whites शेड्सचा वापर करून खूप सावल्या बनवल्या असतात आणि सगळी पात्रं स्वत:च्याही नकळत अनाहूतपणे एका क्लेशकारक शेवटाकडे प्रवास करत असतात. पुणे ५२ नोआर फिल्मच्या या सगळ्या पायऱ्या पूर्ण करतॊ पण तरीही तो अस्सल मराठी - आणि त्यातही पुणेरी- मातीतला वाटतो. 

गोष्ट घडते १९९०-९२ च्या दरम्यान. ही गोष्ट आहे अमर आपटे नावाच्या एका डिटेक्टिव्हची. अमर डिटेक्टिव्ह असला तरी तो शेरलॉक होम्स नाही, ज्याला अशिलाच्या डाव्या पायातल्या शूजवरची धूळ बघून त्याची आख्खी कुंड्ली मांडता येते किंवा बॉन्डही नाही जो पेनाची बंदूक, गाडीतून विमान, चष्म्यातून केमेरा वगैरे बनवू शकतो. तो एक (पुणेकर जितके साधे असू शकतात तितका) साधा पुणेकर आहे. सध्या त्याची घरची परिस्थिती आणि बायको दोन्हिही बरं नाही. U.S.S.R. (रशिया)चं विभाजन बघितल्यानंतर स्वत:च्या घरचं विभाजन होणार नाही ना ह्याची तो काळजी करतो इतका साधा! अमरचं love marriage झालेलं आहे आणि त्याची बायको (प्राची) त्याच्या गरीबीला आणि सच्चेपणाला आता कंटाळलीए. पैसे कमवण्यासाठी, डिटेक्टिव्ह म्हणून जे काम करायचा त्याला मनस्वी तिटकारा आहे, ते काम तो करायला लागतो- ते म्हणजे आशिलाच्या (आशील म्हणजे client) जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधाचे पुरावे गोळा करणे! 

अमर ज्या बाईच्या extra marital affair चे पुरावे शोधतोय, तिचं affair ज्या माणसाशी सुरूए, त्या माणसाची बायको (?) म्हणजे नेहा अमरला स्वत:च्या नवऱ्यावर पाळत ठेवायला लावते (हुश्श!). नेहाचा नवरा (प्रसाद साठे) हा पुण्यातला अत्यंत मोठा बिल्डर आहे. नेहाची केस घेतल्यानंतर अमर हळूहळू तिच्यामध्ये गुंतत जातो. प्राची तिच्या कटकट्या स्वभावामुळं ह्यांना खतपाणी घालते आणि एकदाचा अमरचा स्वत:वरचा ताबा सुटतो. त्यानंतर जे घडतं ते साहजिकच जास्त अवघड अवघड, गंभीर होतं जातं. सगळी characters काळपट पडायला लागतात आणि एका अवघड वळणावर येऊन चित्रपट संपतो. तोपर्यंत आपण सुन्न झालेलो असतो. 

चित्रपटाचं camera work अप्रतीम आहे. single takes मस्त जमले आहेत. काळ्या पांढऱ्या सावल्यांमुळं ती गोष्ट जास्त गडद होत जाते. गिरीश कुलकर्णीने बाणेदार, कणखर (तरीही भेदरट), frustrated अमर आपटे जीवंत उभा केला आहे. सोनाली कुलकर्णी ने nagging, कटकट्या बायकोचं काम मस्त केलंय. आणि सई ताम्हणकर आहे femmes fatales (seductive व्हीलन लेडी) लाजवाब! गिरीशच्या (पुन्हा कुलकर्णीचं - आपल्याला हा इसम जाम आवडतो)) संवादांनी कथेमध्ये जान आणली आहे. (उदा. "Globalize व्हा आपटे!", " माझ्याचं स्कूटरवरून येणारेस का?", "प्रामाणिक प्रयत्न चाललाय खड्यात पडायचा!" आणि अनेक). अमर जेव्हा फ़ोटो काढत असतो तेव्हा त्याच्यामागून अगदी त्याच्यासारखाचं वाटणारा तसेच कपडे घातलेला अजून एक माणूस त्याचे फ़ोटो काढत असतो. त्या Scene वरून Christopher Nolan च्या 'DOODLEBUG' shortfilm ची आठवण झाली. (ही एक सिक्सर shortfilm आहे.) अमर आणि प्राचीच्या भांडणाचा सीन अंगावर येतो. त्याशिवाय घरटं, चपटं नाणं, चहाचा कप वगैरे प्रतिकांचा वापर जमून आलाय (शी किती घाऊक कौतुक वाटतंय)  

पण हा चित्रपट एवढाचं नाही. दिग्दर्शकाला त्या गोष्टीच्या पलिकडं जाऊन काहीतरी म्हणायचयं. आणि ते जास्त महत्वाचं आहे. निखिलने एक आपला छंद म्हणून चित्रपट १९९०-९२च्या काळात सेट नाही केलाय. त्या सगळ्या कथानकाला जागतिकिकरणाचा एक आयाम (dimension) आहे. आपला हिरो अमर स्वत:ची जुनी स्वप्न, पुणेरी बाणेदारपणा ('फ़ुकटचं घेणार नाही' छाप) स्वत:च्याही नकळत सोडून देतो.  जागतिकीकरणामुळं मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या मुल्यांचं गाठोड कसं टकून द्यावं लागलं आणि एक नवीन मुल्यपध्द्ती जन्माला आली जीचा पाया पैसा आहे ही चित्रपटाची theme आहे आणि ही theme चित्रपटाच्या Titles पासून दिग्दर्शक आपल्याला सांगतो.  

पुणे ५२ बघायच्या आधी चित्रपटबद्द्ल खूप ऐकलेलं, वाचलेलं (moifightclub वरून स्क्रीप्टपण वाचलेली) त्यामुळं अर्थातचं खूप अपेक्षा होत्या. आणि चित्रपट त्यावर खराखुरा उतरला पण तरीपण काही प्रश्न पडले. खरंच प्रश्न आहेत, 'उगाच नम्रता दाखवून मारणे' असला प्रकार नाही. 

१. Globalizationमुळं प्रामाणिक मूल्य सोडून देणाऱ्या मध्यमवर्गाची ही प्रातिनिधिक गोष्ट आहे तर गोष्टीचा हिरो हा डिटेक्टीव्ह असायलाच हवा होता का? तो bank कर्मचारी, सरकारी कर्मचारी असला असता तर गोष्ट मध्यमवर्गाची जास्त वाटली असती का? (कारण डिटेक्टीव्ह हे काही मध्यमवर्गाला फार familiar profession नाही.)

२. नेहा अमरकडं का जाते? (अजून डीटेल सांगितलं तर चित्रपटतली मजा जाईल.)

३. चित्रपटामध्ये दखवलेली 'globalization मुळे मूल्यऱ्हास' ही theme कथेशी समरस झालीए का त्यामध्ये तफ़ावत आहे? 

बास! वरचे प्रश्न वगैरे सोडा आणि लिंकवरून लगेच पुणे ५२ बघाअभी के अभी!



                                                स्टाईलीश. कडक Performance!