Sunday 20 July 2014

Short-CULT movies

'चित्रपट हा कुणासाठी बनवायचा?' मला वाटतं चित्रपट बनवायला लागल्यापासून काही वर्षातचं हा प्रश्न पडायला लागला असेल. अजून तळ शोधायचा प्रयत्न केला तर मला हा प्रश्न 'कला कशासाठी? लोकनुरंजन? की self-expression? की आणखी काही?' असा वाटतो. प्रत्येक कलाकार त्याच्या त्याच्या पध्द्तीनं ह्या प्रश्नाचा माग काढतो पण नवीन  येणार्यासाठी तो प्रश्न तिथेच उभा असतो. त्यात चित्रपट हे collective art, खर्चिक कला म्हणून प्रयोग करून बघण्याला आधीच मर्यादा पडतात. ह्या सगळ्यातून वाट शोधताना सर्वात effective पर्याय दिसतो तो shortfilmsचा!

Shortfilm म्हणजे फक्त 'कमी वेळाचा सिनेमा' हे खरं नाही. सिनेमा मध्ये नसलेल्या अनेक गोष्टी आपल्याला shortfilms बघायला मिळतात. Shortfilm जास्त personal अनुभव घेऊन येतात. एक छोटी कल्पना, भावना, घटना ह्यासगळ्यांशी प्रामाणिक राहून गोष्ट सांगता येते फार फ़ाफ़ट पसारा न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'प्रेक्षक' नावाचं काल्पनिक भूत (खरं म्हणजे माकड) मानगुटीवर नसतं. ३ shortfilms बद्दल लिहायचं ठरवलंय आज. ह्या तीनही shortfilms मध्ये फार काही साम्य नाही. तीनही दिग्दर्शक भारतीय आहेत आणि तीनही माझ्या आवडत्या shortfilms आहेत. एवढंच.

१. गिरणी (दिग्दर्शक : उमेश कुलकर्णी) -

काही दिग्दर्शकांवर आपलं मनापासून प्रेम असतं जसं की अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज वगैरे. त्यांच्यासोबत उमेश माझा आणखी favorite दिग्दर्शक! 'गिरणी' ही त्याच्या पहिल्या काही Shortfilm पैकी एक. ही गोष्ट आहे समीर नावाच्या एका १०, ११ वर्षांच्या मुलाची. वडील अचानक गेल्यानंतर घरची अत्यंत बेताची असलेली परिस्थिती सावरण्यासाठी त्याची आई एक गिरणी घरी आणते. दळणाचा व्यवसाय करून काही पैसे कमवावेत, हळूहळू हप्ते फ़ेडून गिरणी स्वत:च्या नावावर झाली की stable income यायला लागेल अशी तिची कल्पना. नवीन खेळणं घरात आल्याच्या उत्साहात समीर दळणाची कामं करायला लागतो. पण कलांतराने ती गिरणी त्याच्या बालपणाचा, स्वप्नांचा, आयुष्याचा आणि एकूण आस्तित्वाचाचं ताबा घेते. आधी असलेलं आकर्षण गळून पडून एक मनस्वी राग, चिडचिड आणि सणक त्याच्या डोक्यात जाते आणि तो final action घेतो.

ती action काय असेल ह्यात सस्पेन्स नाही पण तेव्हापर्यंत दिग्दर्शकाने आपल्याला समीरच्या ठिकाणी नेऊन ठेवलं असतं. त्यामुळं तो जे करतो ते खूप स्वाभाविक वाटतं. 'जगण्याची साधनं म्हणून हातात घेतलेल्या गोष्टी हळूहळू आपलं आयुष्य गिळून टाकतात आणि आपण एका चक्राकार फेऱ्यात फिरत राहतो' ही theme Shortfilm मधून पुनःपुन्हा अधोरेखीत होते.

२.  Printed Rainbow (दिग्दर्शक : गितांजली राव) -

ही एक Animated Shortfilm आहे २००६ ची. नंतर काही दिवसतरी आपल्याला मनातून ही गोष्ट पुसता येणं अवघडं जावं इतकी सुंदर गोष्ट ही. पण आपण जर Visual quality च्या पलीकडं जाऊन ही फिल्म बघू शकलो तरच किंवा Cannes festival मधली ही award Winning shortfilm आहे हे कळलं तर! गितांजलीने संपुर्ण फ़िल्ममधली चित्रं ३ वर्षं स्वत:च्या हातानं काढलीएत.

ही गोष्ट आहे एका म्हाताऱ्या आज्जीची जी तिच्या मांजरीसोबत एकटी रहतीए. तिच्याकडं काडेपेट्यांचा (matchbox) चा मोठा साठा आहे. तिच्या एकटीच्या कंटाळवाण्या आयुष्यातून ऊठून आपल्या मांजरासोबत ती काडेपेट्यांच्या मदतीने रंगबेरंगी स्वप्नांच्या दुनियेत फ़िरून येत असते. एकदा शेजारचे एक आजोबा तिच्या घरी येतात. त्यांच्याकडं एकाच प्रकारच्या २ काडेपेट्या असतात त्यातली एक आज्जीला देतात आणि एक स्वत:कडे ठेवतात. दुसऱ्या दिवशी आपली 'heroine आज्जी' आजोबांनी दिलेल्या काडेपेटीमधून तिच्या विरामाच्या प्रवासाला निघते. खऱ्या अर्थानं सुखांत असलेली ही कथा आहे.

'वासांसि जीर्णानि' या हिंदू किंवा भारतीय philosophyचं हे artistic expression खूप भावणारं आहे. आज्जीचं नेहमीचं आयुष्य black and white तर स्वप्नातलं आयुष्य color ही कल्पना खूप मस्त जमून आलीए (ती typical किंवा cliche वाटतं नाही). आज्जी जेव्हा खिडकीतून बाहेरचं जग बघते तो भाग Hitchcock च्या rare window सारखा वाटतो. एकुणातचं ही फिल्म खूप वेगळा अनुभव देऊन जाते.

३.  कातळ (दिग्दर्शक : विक्रांत पवार)

ही सुध्दा विक्रान्तची फिल्मस्कूल्मधली shortfilm. मी त्याची घड्याळांचा दवाखाना नावाची shortfilm आधी बघितलेली तीसुद्धा खूप सुंदर आहे पण कातळ मला त्यापेक्षा काही पावलं पुढची वाटली. परवा एका मित्राशी कातळ बद्दल बोलत होतो. तो म्हणला मला एवढी नाही आवडली गोष्ट मी त्याला खूप पटवायचा प्रयत्न केला आणि त्याने मला. (अर्थात) आम्ही दोघंही आमच्या आमच्या मतावर ठाम राहिलो पण त्याच्याशी बोलताना मला दिसलं की मला ही shortfilm एवढी का आवडली!

वरवर बघायला गेलं तर ह्याला एक स्पष्ट गोष्ट अशी नाही आणि म्हणलं तर आहेही! एक मुलगा शिल्पकार आहे. त्यांनी एक कातळ आणलाए ज्यापासून त्यांना शिल्प बनवायचंय पण तो कातळ तितका strong नाही त्यामुळं आता काय करावं ह्या विचारात तो आणि त्याचा मित्र आहेत. तेवढ्यात त्याला त्याच्या girlfriend चा फोन येतो ती शिकायला दुसऱ्या शहरात जाणारे आणि उद्या निघणारे. म्हणून तो हा आख्खा दिवस तिच्यासोबत फिरायला जातो. बास! एवढंच. पण दिवसभर तिच्यासोबत घालवल्यानंतर त्याला जे realization होतं ते म्हणजे 'कातळ' ! नाटकात absurdity आणता येते पण चित्रपटात कसं सगळं concrete ठाशीव लागतं. पण फिल्म सारख्या concrete माध्यमातून intangible emotion पकडण्याचा विक्रान्तचा प्रयत्न वरचा क्लास आहे. तीन्ही shortfilms खूपच सुंदर आहेत पण हे विशेषण मी ह्या फ़िल्मसाठी ठेवलं होतं. 'तरल चित्रपट!'

(तळटीप - Printed Rainbow आणि कातळ दोन्ही shortfilms Youtube वर आहेत आणि त्याच्या लिंक्स त्यांच्या टायटल्समध्ये आहेत. गिरणी नाही मिळाली Youtube वर. पण माझ्याकडं आहे If anyone wants.)


                             उमेश कुलकर्णी          गितांजली राव               विक्रांत पवार

No comments:

Post a Comment